लोकलमधली आपली ये-जा रोजचीच. बायकांच्या एरवीच्या त्याच त्या कामाचं घराबाहेरचं एक्स्टेंशन म्हणायचं का या प्रवासाला? पण नेहमीच हे सगळं इतकं कंटाळवाणं नसतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर कधीच नसतं. रोजच्या रोज प्रवास करूनही इथे नवं काहीतरी सापडल्याशिवाय राहत नाही. ‘फूड फॉर थॉट’ म्हणावं तसं. लोकलच्या हँडल्सना लोंबकळताना आलेल्या अशा अनुभवांना मांडण्याची ही जागा. प्रहार दैनिकामध्ये दर गुरुवारी प्रसिद्ध होणारे सदर

Thursday, 15 September 2011

बायका शोधतात रंग

५ मे २०११ 

एकूण बायकीपणा ही काही चारचौघांत मिरवण्यासारखी गोष्ट उरलेली नाही. पुरुषांसाठी तर ते लांच्छनच; पण बायकांनीही उघडपणे बायकीपणा करणं काही सोफेस्टिकेशनचं लक्षण नाही. सोफेस्टिकेशनचा डिक्शनरी अर्थ आहे लपवणं, बाहेरून आवरण घालणं इत्यादी..थोडक्यात जे आहोत त्याच्यापेक्षा वेगळं काही तरी दाखवणं. त्यामुळे सोफेस्टिकेटेड असण्यात बायकीपणा बसत नाही. तरीही बायका बायकांसारख्या वागतातच. इलाज नसतो त्याला. त्या दिवशी ट्रेनच्या डब्यामध्ये एक मुलगीशी दिसणारी बाई चढली. तिच्या हातामध्ये मेकअपसाठी लागणाऱ्या यच्चयावर सामानाने भरलेली पिशवी होती. तिने जादूची पोतडी उघडावी तशी ती पिशवी उघडली आणि त्यातून एक एक वस्तू बाहेर येऊ लागताच गोष्टीतल्या पुंगीवाल्याच्या मागून मुलांनी जावं तशा भोवतालच्या बायका त्या सामानावर तुटून पडल्या. सामानामध्ये सगळं काही होतं. नेलपॉलिश, लिपस्टिक्स, लीप पेन्सिल्स, आयशॅडो, आयपेन्सिल्स, ब्लशऑन्स, कॉम्पॅक्ट्स, हे सगळं चेह-यावर लावण्यासाठीचे, पावडर पफ्स, विविध आकाराच्या ब्रशचे सेट्स, खेरीज काजळाच्या स्टिक्स, पारदर्शक नेल हार्डनिंग, नेल एनॅमल्स.. कंपनीचं नाव अजिबातच माहितीतलं नव्हतं. फर्स्ट क्लास होता. त्यामुळे त्या सगळ्या उत्पादनांवर तुटून पडलेल्या बायका एरवी स्टँडर्ड कंपन्यांची प्रॉडक्ट्स वापरणा-यांपैकीच होत्या. तरीही त्या नेलपेंट्सच्या बाटल्या उघडून, लिपस्टीक्सच्या, पेन्सिल्सच्या शेड्स पालथ्या तळव्यावर लावून पाहात होत्या. त्या रंगांना नुस्तं पाहाण्यात, त्यांची कॉम्बिनेशन्स मनातल्या मनात तयार करण्यात किती वेळ मजेत गेला सगळ्यांचा.
 
सगळा नुसता रंगांचा खेळ होता. सगळं आकर्षण रंगांचं. कुणी रंगीत बांगडय़ा विकायला आलं, कुणी कानातले विकायला आलं, कुणी स्कार्फ विकायला आलं कीसुद्धा असंच होतं. बायकांचा डबा नेहमीच रंगांनी भरलेला असतो. कपडय़ांचे, साडय़ांचे, साध्याशा टी-शर्ट्सचेही रंग हौसेने निवडलेले असतात. इंटरनेटवर शोधता शोधता एका सव्‍‌र्हेचा रिझल्ट नुकताच वाचला. बायकांना कोणते रंग आवडतात याबद्दलचा. सगळे आवडीचे रंग लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा अशा छटांच्या जवळपास जाणारे, काळ्या-पांढ-याचा फारसा उल्लेख नाही. रेल्वेचा डबा म्हणजे या निष्कर्षाचा डिस्प्लेच. कॉलेजमध्ये जाणा-या मुलींच्या नखांवर मिरवणा-या जवळपास फ्लुरोसंट हिरव्या, गुलाबीपासून पन्नाशी ओलांडलेल्यांच्या स्वभावाला साजेशा शांत समजूतदार पेस्टल शेड्सपर्यंत सगळे रंग. ते ल्यायलेल्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही आपणहूनच खूप काही सांगणारे. खूप बोलके. म्हणजे रंग इतर डब्यांतही असतात, काळे-पांढरे, फिकट निळे, फिकट हिरवे आणि तपकिरी सगळेच. पण त्यांचं रंगपण जाणवतं याच एका डब्यात. बायकीपणाची एक व्याख्या या रंगांच्या वेडाशी संबंधित असणार असेल तर निदान त्यात तरी लपवण्यासारखं, लाजिरवाणं काही नाही. हे छंद मिरवायलाच हवेत. हे बोलकेपण, रंगीतपण कुठच्याच सोफेस्टिकेशनची तमा न बाळगता जपायला हवं.

लिंक - http://www.prahaar.in/madhyantar/streevidha/41087.html  

क्लेम

२८ एप्रिल २०११, प्रहार 

ट्रेनमध्ये शिरण्यापुरती जागा मिळाली की पहिलं लक्ष्य असतं क्लेम बुक करण्याचं. (जागा मिळणं ही फार नंतरची गोष्ट) पण त्या दिवशी जरा वेगळा प्रयोग करून बघावा म्हटलं. म्हणजे व्यवस्थेला धक्काबिक्का देण्यासाठी नाही. पण काय प्रतिक्रिया मिळते एवढं चाचपडून बघण्यासाठी. मी तिस-या सीटवर होते. जागेसाठीच्या एरवी होणा-या चौकशांना त्या दिवशी अजिबातच दाद दिली नाही. माझ्या शेजारच्या जागेवर म्हणजे दुस-या सीटवर कुणी क्लेम केलंय का, याच्याकडेही लक्ष दिलं नाही. आणि ती बाई उठल्यावर तिच्या जागेवर बसले. ठरल्याप्रमाणे कुणी तरी क्लेम केला होताच. त्या मुलीने तसं सांगितल्यावर मी म्हटलं, ‘या व्यवस्थेवर माझा विश्वास नाही.’ यावर भांडण होईल असं मला वाटलं होतं, पण तिने ते चक्क समजून घेतलं. ‘अरे वा! बरं मग आता तुमच्या शेजारची जागा रिकामी होणार आहे. तुम्ही सरकणार ना? की त्यावरही विश्वास नाही?’ मी म्हटलं ‘अर्थातच सरकणार!’
 
मस्त! म्हणजे असाही संवाद शक्य आहे. प्रयोग थोडा का होईना यशस्वी झाला. अर्थातच त्या मुलीच्या सहिष्णूपणामुळे. एरवी ‘क्लेम’ही भानगड म्हणजे महिला डब्यातल्या नव्वद टक्के भांडणांच्या मुळाशी असते. या भांडणाचे नियम कधी कधी बरेच गुंतागुंतीचे, समजायला कठीण असतात. म्हणजे कोणत्या सीटवर नेमका कुणी आणि कधी क्लेम सांगितला आहे? क्लेम मूळ जागेवर आहे की ‘शिफ्ट’ होण्याच्या जागेवरचा आहे? हे सगळं समजून घेणं कठीण असतं. त्यात बसल्या जागी पेंगणा-यांना समोर उभ्या राहिलेल्या जवळ जवळ प्रत्येकीला आपण कुठे उतरणार, याचं उत्तर न कंटाळता द्यावंच लागतं. कुणी क्लेम सांगितलेला आहे की नाही, हेसुद्धा लक्षात ठेवून सांगावं लागतं. तसं न करणं म्हणजे व्यवस्थेशी फटकून राहाणं. आणि तसं कुणी सहसा करत नाहीच.
 
या व्यवस्थेचा आधार न घेता प्रवास करण्याचं कुणी ठरवलंच तर त्याचे तोटे बरेच असतात. म्हणजे डब्यातल्या गर्दीतून उरलेल्या रिकाम्या फटींतून घुसत घुसत उभं राहाण्यापुरती जागा केली की चौफेर नजर फिरवत, बसलेल्या प्रत्येकाच्या चेह-याचं आणि देहबोलीचं बारकाईने निरीक्षण करावं लागतं. कोणत्या बाईने हातातलं पुस्तक वाचणं आवरतं घेतंय, कोणी हातातल्या पिशवीची चाळवाचाळव करतंय, कोण रॅकचं सामान काढण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करतंय. थोडक्यात कोणती बाई पुढच्या दोन-तीन स्टेशन्सपैकी कुठे तरी उतरणारी असेल आणि तिची जागा आपल्याला कशी मिळू शकेल, याचा अंदाज घेणं. हे खूपच कटकटीचं आणि तुमची कामाच्या कटकटीतून आधीच संपायला आलेली ऊर्जा शोषून घेणारं असतं. त्यापेक्षा क्लेम सांगितला की ती जागा मिळेपर्यंतर एक खात्रीचं आशास्थान तयार होतं. आणि जागा मिळणार नाहीच, असं नक्की झालं की आता उभ्याने प्रवास करायचा, अशी मनाची तयारी होते. असे काही फायदे या व्यवस्थेचे आहेत. पण ती जुनी होत चालली आहे तसतशी इतर सगळ्या व्यवस्थांसारखीच कर्मठ होत चालली आहे. भीडेपोटी क्लेम न लावणारी एखादी उतरण्याच्या स्टेशनपर्यंत उभीच राहाते आणि चढल्या चढल्या जागा बुक करणा-या एखादीला अगदी पुढच्याच स्टेशनवर रिकाम्या जागेची लॉटरी लागून जाते.
 ही पद्धत पुरुषांच्या डब्यातही इतक्या हिरीरीने आणि अगदी भांडण होईपर्यंत वापरली जाते की नाही माहीत नाही. पण बायकांच्या डब्यात अगदी रोजच्या रोज होणारे हे वाद बघणं काही बरं नाही वाटत. घराच्या चौकटीतून आत्मविश्वासाने बाहेर तर पडलो तरीही छोटय़ा स्तरावरच्या भांडणांशी आपलं नातं सुटत नाहीच. बाईच्या हातात सतत घरगुती, स्वयंपाकघराच्या पातळीवरची सत्ताच आल्यामुळे असं झालंय का कुणास ठाऊक की छोटय़ा जागांपुरत्या जय-पराजयांतून डोकं वरंच काढता येऊ नये? ‘क्लेम’ ची घट्टमुट्टं व्यवस्थाही अशीच याच वृत्तीला खतपाणी घालतेय का? दिवसभरच्या कामामुळे दमणं, थकणं, प्रवास लांबचा असल्यामुळे विसावा मिळवावासा वाटणं सगळं अगदी बरोबर आहे. ट्रेनच्या डब्यातली ती एवढीशी सीट खरं तर फक्त एक प्रतीक. आपली सगळी बुद्धी, सगळी समज, सगळं प्रसंगावधान, सगळा संताप अशा एवढय़ाशा गोष्टींभोवतीच फिरत राहाणं खरंच खूप गरजेचं आहे का? कधी तरी या सगळ्याला ‘जाऊ दे’ म्हणून ओलांडून बाहेरच्या मोठय़ा जगात पाऊल टाकणं खरंच अशक्य आहे का?  

तुम्ही चांगल्या आहात ना?

ट्रेनमध्ये तशी बरीच गर्दी होती. म्हणजे सगळ्या चौथ्या सीट्स फुल्ल. उभ्या राहण्याच्या जागा भरलेल्या एवढय़ापुरतीच नाही. तर ट्रेनला बसलेल्या प्रत्येक गचक्यासरशी एकमेकांना खेटून तीन तीन च्या रांगेत उभं राहिलेल्यांचा तोल जावा आणि शर्थीचे प्रयत्न करूनही बसलेल्या जणींच्या अंगावर कोसळणं शक्य होऊ नये इतकी. अशा गर्दीत डोक्यावर एक ब-यापैकी वजनाची पिशवी घेऊन उभी असलेली एक बाई जवळजवळ रडकुंडीला आलेली. तिला रेल्वेच्या अशा प्रवासाची बहुतेक सवय नसावी. कारण पिशवी डोक्यावर सांभाळणं, वरचं हॅण्डल पकडणं, उभं राहणं, तोल सांभाळतं हे एकाच वेळी करणं तिला बिलकूलच जमत नव्हतं. अशा वेळी थोडा मदतीचा हात पुढे करण्याचं कर्तव्य बहुतेक जण एकाच ‘डब्याचे’ प्रवासी या नात्याने करत असतात.
 
मीही विचारलं, ‘घेऊ का ती पिशवी?’
 
अपेक्षित उत्तर, ‘नको नको कशाला?’ किंवा ‘ थँक्यू’ म्हणजे हो किंवा नाही इतकंच असणं अपेक्षित होतं.
 
पण उत्तराऐवजी प्रश्न आला, ‘तुम्ही चांगल्या आहात ना?’
 
असा प्रश्न मला इतक्या थेटपणे कधीच कोणीच विचारला नव्हता. मी मनातल्या मनात प्रामाणिकपणे उत्तर जुळवायला लागले. प्रश्नाचा अर्थ घ्यायचा तरी कसा? आपण चांगले आहोत की वाईट याचं नेमकं उत्तर आपल्याला कधी तरी मिळतं का? आणि तेही इतक्या कमी वेळात असं रेल्वेच्या सीटवर ओठंगून बसलेल्या अवस्थेत ते शोधायचं.. स्वत:शी प्रामाणिक राहून, फसवाफसवी न करता त्याचं उत्तर द्यायचं आणि त्या उत्तरावरून ती बाई हे ठरवणार की ती पिशवी माझ्या हातात द्यायचं की नाही. ती नव्या युगातली सॉक्रेटिस वगैरे आहे की काय?
 
दोन सेकंदात एवढे सगळे विचार माझ्या मनाशी आले. पण प्रत्यक्षात मी ‘काय?’ एवढंच विचारू शकले.
 
‘चांगल्या म्हणजे तुम्ही ब-या आहात ना?’ तिने पुन्हा विचारलं.
 
तिची ती पिशवी घेण्यात मला आता काडीचाही रस राहिलेला नव्हता. कारण आता तिच्या प्रश्नाचा रोख काय असू शकेल याचा अंदाज मला येऊ लागला होता. माझे पाळीचे दिवस सुरू नाहीत ना? असं तिला विचारायचं असणार असं माझ्या लक्षात आलं होतं आणि ते खरं होतं. पण तो शब्दही उघड उच्चारण्याचं तिला अवघड जात होतं.
 
‘नाही आताच शिर्डीवरून आले मी, पिशवीत बाबांची फुलं आहेत. बाकी काही नाही?’
 
बाकी काही नाही म्हणजे, तेवढा मुद्दा सोडला तर प्रश्न होताच कुठे? तिची पिशवी घेण्याची दुर्बुद्धी झाल्याबद्दल स्वत:चा खूप राग आला. आजूबाजूच्या बायकांनीही मी काय कौल देतेय यासाठी कान टवकारून असल्याचा भास झाला. मी ‘हो’ म्हटलं तर त्यांच्याही लेखी मेंदूतल्या मेंदूत अस्पृश्यच बनणार होते मी. ‘नाही’ म्हटलं तरीही शंकेला वाव होताच. खूप खरमरीत उत्तरं मनाशी आली पण शेवटी,
 
‘तुम्हाला असं काही वाटत असेल तर राहू द्या.’ एवढं उत्तर कसंबसं दिलं.
 
पण नेमकं उत्तर हे नव्हतंच. उत्तरादाखल खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते. म्हणजे निव्वळ तर्कशास्त्रावर आधारलेले आणि समाजसुधारणावादी अँगलमधून सुचणारे असे सगळ्या रेंजमधले प्रश्न.
 
‘तुम्ही अजून हे सगळं कसं मानता?’, ‘एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये किती जणींचा हात लागला असेल त्या पिशवीला, ते कसं चाललं?,
 
‘आपला विटाळ मानणारा देव आपला कसा?’, ‘नवा जीव जन्माला येणं ही आपण चांगली गोष्ट मानत असू तर त्याच्यासाठीची तयारी ही अपवित्र कशी?’ आणखी असं बरंच काही. पण त्यातलं काहीच विचारलं नाही. त्यातून कितीसं प्रबोधन होणार होतं. अजून कितीतरी घरं अशी आहेत जिथे पाळीत बाहेर बसण्याची रीत सुरूच आहे. अगदीच वेगळं बसणं शहरातल्या जागेच्या अडचणींमुळे खरंच अडचणीचं बनल्यामुळे ती रीत परस्परच बाद झाली आहे असं म्हणावं तर निदान देवाजवळ तरी जाऊ नये, पूजा किंवा धार्मिक विधींच्या दिवशी तरी तेवढं ‘पाळावं’, स्वयंपाकघरात जाऊ नये, पाण्याला हात लावू नये वगैरे पळवाटांनी सुरू आहेच. हे होत राहतं याचं कारण पाळीचा संबंध अशुद्ध असण्याशी आहे ही गोष्ट मनातून पार खोडून काढणं आपल्यातल्या बहुतेकींना अजूनही जमलेलं नाहीच आहे. मनाचा हिय्या करून त्याविरूद्ध झगडू जावं तरीही आपल्याच मनातला अपराधी भाव ब-याच जणींना आजही त्रास देतोच. रेल्वेच्या डब्यामधल्या सगळ्याच जणी या समजुतींवर पाणी सोडून उंबरठय़ाबाहेर पडल्या असतील याची खात्रीही देता येणार नाहीच. मग त्या एकटय़ा बाईला दोष कुठून द्यायचा?
 
गंमत फक्त तिने विचारलेल्या प्रश्नाची. ‘तुम्ही चांगल्या आहात ना?’
 खरोखरच आपल्या चांगुलपणाची व्याख्या बाईला तिची शारीरिक स्थिती, तिचा इतिहास, तिचं चारित्र्य वगैरेंशिवाय केव्हा करता येईल?