ट्रेनमध्ये तशी बरीच गर्दी होती. म्हणजे सगळ्या चौथ्या सीट्स फुल्ल. उभ्या राहण्याच्या जागा भरलेल्या एवढय़ापुरतीच नाही. तर ट्रेनला बसलेल्या प्रत्येक गचक्यासरशी एकमेकांना खेटून तीन तीन च्या रांगेत उभं राहिलेल्यांचा तोल जावा आणि शर्थीचे प्रयत्न करूनही बसलेल्या जणींच्या अंगावर कोसळणं शक्य होऊ नये इतकी. अशा गर्दीत डोक्यावर एक ब-यापैकी वजनाची पिशवी घेऊन उभी असलेली एक बाई जवळजवळ रडकुंडीला आलेली. तिला रेल्वेच्या अशा प्रवासाची बहुतेक सवय नसावी. कारण पिशवी डोक्यावर सांभाळणं, वरचं हॅण्डल पकडणं, उभं राहणं, तोल सांभाळतं हे एकाच वेळी करणं तिला बिलकूलच जमत नव्हतं. अशा वेळी थोडा मदतीचा हात पुढे करण्याचं कर्तव्य बहुतेक जण एकाच ‘डब्याचे’ प्रवासी या नात्याने करत असतात.
मीही विचारलं, ‘घेऊ का ती पिशवी?’
अपेक्षित उत्तर, ‘नको नको कशाला?’ किंवा ‘ थँक्यू’ म्हणजे हो किंवा नाही इतकंच असणं अपेक्षित होतं.
पण उत्तराऐवजी प्रश्न आला, ‘तुम्ही चांगल्या आहात ना?’
असा प्रश्न मला इतक्या थेटपणे कधीच कोणीच विचारला नव्हता. मी मनातल्या मनात प्रामाणिकपणे उत्तर जुळवायला लागले. प्रश्नाचा अर्थ घ्यायचा तरी कसा? आपण चांगले आहोत की वाईट याचं नेमकं उत्तर आपल्याला कधी तरी मिळतं का? आणि तेही इतक्या कमी वेळात असं रेल्वेच्या सीटवर ओठंगून बसलेल्या अवस्थेत ते शोधायचं.. स्वत:शी प्रामाणिक राहून, फसवाफसवी न करता त्याचं उत्तर द्यायचं आणि त्या उत्तरावरून ती बाई हे ठरवणार की ती पिशवी माझ्या हातात द्यायचं की नाही. ती नव्या युगातली सॉक्रेटिस वगैरे आहे की काय?
दोन सेकंदात एवढे सगळे विचार माझ्या मनाशी आले. पण प्रत्यक्षात मी ‘काय?’ एवढंच विचारू शकले.
‘चांगल्या म्हणजे तुम्ही ब-या आहात ना?’ तिने पुन्हा विचारलं.
तिची ती पिशवी घेण्यात मला आता काडीचाही रस राहिलेला नव्हता. कारण आता तिच्या प्रश्नाचा रोख काय असू शकेल याचा अंदाज मला येऊ लागला होता. माझे पाळीचे दिवस सुरू नाहीत ना? असं तिला विचारायचं असणार असं माझ्या लक्षात आलं होतं आणि ते खरं होतं. पण तो शब्दही उघड उच्चारण्याचं तिला अवघड जात होतं.
‘नाही आताच शिर्डीवरून आले मी, पिशवीत बाबांची फुलं आहेत. बाकी काही नाही?’
बाकी काही नाही म्हणजे, तेवढा मुद्दा सोडला तर प्रश्न होताच कुठे? तिची पिशवी घेण्याची दुर्बुद्धी झाल्याबद्दल स्वत:चा खूप राग आला. आजूबाजूच्या बायकांनीही मी काय कौल देतेय यासाठी कान टवकारून असल्याचा भास झाला. मी ‘हो’ म्हटलं तर त्यांच्याही लेखी मेंदूतल्या मेंदूत अस्पृश्यच बनणार होते मी. ‘नाही’ म्हटलं तरीही शंकेला वाव होताच. खूप खरमरीत उत्तरं मनाशी आली पण शेवटी,
‘तुम्हाला असं काही वाटत असेल तर राहू द्या.’ एवढं उत्तर कसंबसं दिलं.
पण नेमकं उत्तर हे नव्हतंच. उत्तरादाखल खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते. म्हणजे निव्वळ तर्कशास्त्रावर आधारलेले आणि समाजसुधारणावादी अँगलमधून सुचणारे असे सगळ्या रेंजमधले प्रश्न.
‘तुम्ही अजून हे सगळं कसं मानता?’, ‘एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये किती जणींचा हात लागला असेल त्या पिशवीला, ते कसं चाललं?,
‘आपला विटाळ मानणारा देव आपला कसा?’, ‘नवा जीव जन्माला येणं ही आपण चांगली गोष्ट मानत असू तर त्याच्यासाठीची तयारी ही अपवित्र कशी?’ आणखी असं बरंच काही. पण त्यातलं काहीच विचारलं नाही. त्यातून कितीसं प्रबोधन होणार होतं. अजून कितीतरी घरं अशी आहेत जिथे पाळीत बाहेर बसण्याची रीत सुरूच आहे. अगदीच वेगळं बसणं शहरातल्या जागेच्या अडचणींमुळे खरंच अडचणीचं बनल्यामुळे ती रीत परस्परच बाद झाली आहे असं म्हणावं तर निदान देवाजवळ तरी जाऊ नये, पूजा किंवा धार्मिक विधींच्या दिवशी तरी तेवढं ‘पाळावं’, स्वयंपाकघरात जाऊ नये, पाण्याला हात लावू नये वगैरे पळवाटांनी सुरू आहेच. हे होत राहतं याचं कारण पाळीचा संबंध अशुद्ध असण्याशी आहे ही गोष्ट मनातून पार खोडून काढणं आपल्यातल्या बहुतेकींना अजूनही जमलेलं नाहीच आहे. मनाचा हिय्या करून त्याविरूद्ध झगडू जावं तरीही आपल्याच मनातला अपराधी भाव ब-याच जणींना आजही त्रास देतोच. रेल्वेच्या डब्यामधल्या सगळ्याच जणी या समजुतींवर पाणी सोडून उंबरठय़ाबाहेर पडल्या असतील याची खात्रीही देता येणार नाहीच. मग त्या एकटय़ा बाईला दोष कुठून द्यायचा?
गंमत फक्त तिने विचारलेल्या प्रश्नाची. ‘तुम्ही चांगल्या आहात ना?’
खरोखरच आपल्या चांगुलपणाची व्याख्या बाईला तिची शारीरिक स्थिती, तिचा इतिहास, तिचं चारित्र्य वगैरेंशिवाय केव्हा करता येईल? 
No comments:
Post a Comment