२८ एप्रिल २०११, प्रहार
ट्रेनमध्ये शिरण्यापुरती जागा मिळाली की पहिलं लक्ष्य असतं क्लेम बुक करण्याचं. (जागा मिळणं ही फार नंतरची गोष्ट) पण त्या दिवशी जरा वेगळा प्रयोग करून बघावा म्हटलं. म्हणजे व्यवस्थेला धक्काबिक्का देण्यासाठी नाही. पण काय प्रतिक्रिया मिळते एवढं चाचपडून बघण्यासाठी. मी तिस-या सीटवर होते. जागेसाठीच्या एरवी होणा-या चौकशांना त्या दिवशी अजिबातच दाद दिली नाही. माझ्या शेजारच्या जागेवर म्हणजे दुस-या सीटवर कुणी क्लेम केलंय का, याच्याकडेही लक्ष दिलं नाही. आणि ती बाई उठल्यावर तिच्या जागेवर बसले. ठरल्याप्रमाणे कुणी तरी क्लेम केला होताच. त्या मुलीने तसं सांगितल्यावर मी म्हटलं, ‘या व्यवस्थेवर माझा विश्वास नाही.’ यावर भांडण होईल असं मला वाटलं होतं, पण तिने ते चक्क समजून घेतलं. ‘अरे वा! बरं मग आता तुमच्या शेजारची जागा रिकामी होणार आहे. तुम्ही सरकणार ना? की त्यावरही विश्वास नाही?’ मी म्हटलं ‘अर्थातच सरकणार!’
मस्त! म्हणजे असाही संवाद शक्य आहे. प्रयोग थोडा का होईना यशस्वी झाला. अर्थातच त्या मुलीच्या सहिष्णूपणामुळे. एरवी ‘क्लेम’ही भानगड म्हणजे महिला डब्यातल्या नव्वद टक्के भांडणांच्या मुळाशी असते. या भांडणाचे नियम कधी कधी बरेच गुंतागुंतीचे, समजायला कठीण असतात. म्हणजे कोणत्या सीटवर नेमका कुणी आणि कधी क्लेम सांगितला आहे? क्लेम मूळ जागेवर आहे की ‘शिफ्ट’ होण्याच्या जागेवरचा आहे? हे सगळं समजून घेणं कठीण असतं. त्यात बसल्या जागी पेंगणा-यांना समोर उभ्या राहिलेल्या जवळ जवळ प्रत्येकीला आपण कुठे उतरणार, याचं उत्तर न कंटाळता द्यावंच लागतं. कुणी क्लेम सांगितलेला आहे की नाही, हेसुद्धा लक्षात ठेवून सांगावं लागतं. तसं न करणं म्हणजे व्यवस्थेशी फटकून राहाणं. आणि तसं कुणी सहसा करत नाहीच.
या व्यवस्थेचा आधार न घेता प्रवास करण्याचं कुणी ठरवलंच तर त्याचे तोटे बरेच असतात. म्हणजे डब्यातल्या गर्दीतून उरलेल्या रिकाम्या फटींतून घुसत घुसत उभं राहाण्यापुरती जागा केली की चौफेर नजर फिरवत, बसलेल्या प्रत्येकाच्या चेह-याचं आणि देहबोलीचं बारकाईने निरीक्षण करावं लागतं. कोणत्या बाईने हातातलं पुस्तक वाचणं आवरतं घेतंय, कोणी हातातल्या पिशवीची चाळवाचाळव करतंय, कोण रॅकचं सामान काढण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करतंय. थोडक्यात कोणती बाई पुढच्या दोन-तीन स्टेशन्सपैकी कुठे तरी उतरणारी असेल आणि तिची जागा आपल्याला कशी मिळू शकेल, याचा अंदाज घेणं. हे खूपच कटकटीचं आणि तुमची कामाच्या कटकटीतून आधीच संपायला आलेली ऊर्जा शोषून घेणारं असतं. त्यापेक्षा क्लेम सांगितला की ती जागा मिळेपर्यंतर एक खात्रीचं आशास्थान तयार होतं. आणि जागा मिळणार नाहीच, असं नक्की झालं की आता उभ्याने प्रवास करायचा, अशी मनाची तयारी होते. असे काही फायदे या व्यवस्थेचे आहेत. पण ती जुनी होत चालली आहे तसतशी इतर सगळ्या व्यवस्थांसारखीच कर्मठ होत चालली आहे. भीडेपोटी क्लेम न लावणारी एखादी उतरण्याच्या स्टेशनपर्यंत उभीच राहाते आणि चढल्या चढल्या जागा बुक करणा-या एखादीला अगदी पुढच्याच स्टेशनवर रिकाम्या जागेची लॉटरी लागून जाते.
ही पद्धत पुरुषांच्या डब्यातही इतक्या हिरीरीने आणि अगदी भांडण होईपर्यंत वापरली जाते की नाही माहीत नाही. पण बायकांच्या डब्यात अगदी रोजच्या रोज होणारे हे वाद बघणं काही बरं नाही वाटत. घराच्या चौकटीतून आत्मविश्वासाने बाहेर तर पडलो तरीही छोटय़ा स्तरावरच्या भांडणांशी आपलं नातं सुटत नाहीच. बाईच्या हातात सतत घरगुती, स्वयंपाकघराच्या पातळीवरची सत्ताच आल्यामुळे असं झालंय का कुणास ठाऊक की छोटय़ा जागांपुरत्या जय-पराजयांतून डोकं वरंच काढता येऊ नये? ‘क्लेम’ ची घट्टमुट्टं व्यवस्थाही अशीच याच वृत्तीला खतपाणी घालतेय का? दिवसभरच्या कामामुळे दमणं, थकणं, प्रवास लांबचा असल्यामुळे विसावा मिळवावासा वाटणं सगळं अगदी बरोबर आहे. ट्रेनच्या डब्यातली ती एवढीशी सीट खरं तर फक्त एक प्रतीक. आपली सगळी बुद्धी, सगळी समज, सगळं प्रसंगावधान, सगळा संताप अशा एवढय़ाशा गोष्टींभोवतीच फिरत राहाणं खरंच खूप गरजेचं आहे का? कधी तरी या सगळ्याला ‘जाऊ दे’ म्हणून ओलांडून बाहेरच्या मोठय़ा जगात पाऊल टाकणं खरंच अशक्य आहे का?
No comments:
Post a Comment